अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- देशभरात गुरुवारपासून (१ एप्रिल) 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी महाराष्ट्राला 26 लाख 77 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
हे लसीकरण राज्यातील साडेतीन हजार केंद्रांवर करण्यात येणार आहे. राज्याला प्रत्येकवेळी लसींचा अपुरा पुरवठा होतो. त्यामुळे त्याचे संपूर्ण राज्यात वाटप करताना मोठी कसरत करावी लागते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या संदर्भात केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली असून, लस उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे. राज्यात 45 वर्षे वयापुढील नागरिकांची संख्या सुमारे तीन कोटी आहे.
त्या तुलनेत लसीकरण केंद्रसंख्या जवळपास साडेतीन हजार आहे. नियोजित लाभार्थींच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी असून, ती तिपटीने वाढवण्याची गरज आहे; तरच वेगाने लसीकरण होऊ शकणार आहे.
नियोजित लाभार्थींची संख्या पाहता लसीकरण केंद्र वाढवण्यासह लसही वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणसाठी 3 लाख 25 हजार 780 डोस मिळाले आहेत.
त्यापैकी पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी 1 लाख 40 हजार, तर पिंपरी-चिंचवडसाठी 45 हजार 780 डोस वाटप करण्यात आले आहेत. तर येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी 1 लाख डोस मिळण्याची शक्यता आहे.
डोस मिळाल्यानंतर ते तळागाळापर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याचे वेळेचे गणितही बसवावे लागते.
चौथ्या टप्प्यासाठी ‘कोविन ऍप’ मधील ‘को-मॉर्बिड’ हा ‘ऑप्शन’ काढून टाकण्यात येणार आहे, अशी माहिती लसीकरणाचे प्रमुख तथा आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.