जखमी नागावर शस्त्रक्रिया करून दिले जीवदान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- राहुरी येथील सर्प मित्रांच्या प्रयत्नाने जखमी झालेल्या पाच फूट लांबीच्या नागावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यामुळे नागाला जीवदान मिळाले असून सर्पमित्र कृष्णा पोपळघट हे त्या नागाची काळजी घेत असून तो बरा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.

अशी माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे १४ जून रोजी एक ५ फुट लांबीचा पूर्ण वाढ झालेला नाग रात्रभर पत्र्यामध्ये अडकून बसला होता. तेव्हा तेथील नागरिकांनी सकाळी परिसरातील वन्यजीव प्रेमी अभी सांगळे यांना फोन करून बोलावले.

अभी सांगळे यांनी जाऊन बघितले. तेव्हा नाग मोठ्या प्रमाणात जखमी असल्याचे निदर्शनात आले. सांगळे यांनी ताबडतोब राहुरी येथील सर्पमित्र व वन्यजीव प्रेमी कृष्णा पोपळघट यांना फोनवरून कल्पना दिली. पोपळघट यांनी नागाला घेऊन वनविभाग कार्यालय गाठले व वनपरीक्षेत्र अधिकारी महादेव पोकळे यांना परिस्थितीची माहिती दिली.

पोकळे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोपळघट यांना नागावर उपचार करण्यासंबंधी पत्र देऊन टाकळीमियाँ येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडे यांच्याशी संपर्क साधून नागावर उपचार करण्यासाठी सांगितले. डॉ. वाकडे देखील लगेच तयारीला लागले.

यावेळी पोपळघट यांच्या सोबत सर्पमित्र मुजीब देशमुख, अभि सांगळे, गुलाब शेख यांनी मोलाची कामगिरी बजावली. जखमी नागावर १२ टाक्यांच्या अर्ध्या तासाच्या शास्त्रक्रियेसह डॉ. वाकडे यांनी आपले कौशल्य पणाला लावले.

शास्त्रक्रियेनंतर वन अधिकारी यांनी नागला बरे होईपर्यंत सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांच्या देखरेखीखाली ठेवण्यासाठी सांगितले. नाग बरा होताच त्याला जंगलात मुक्त केले जाईल, असे कृष्णा पोपळघट यांनी सांगितले. सदर घटनेननंतर संपूर्ण तालुक्यातून या सर्पमित्रांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

यावेळी सहाय्यक वनपाल गायकवाड, परदेशी, वनरक्षक निकम, ताराचंद गायकवाड यांचे देखील सहकार्य लाभले.

अहमदनगर लाईव्ह 24