अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा जून किंवा जुलैमध्ये घेण्यात याव्या, असे
मत 69.3 टक्के लोकांनी व्यक्त केले, यात 45.5. टक्के शिक्षक, 11.7 टक्के विद्यार्थी-पालक असून 40 टक्के अन्य नागरिक आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, औषधांची कमतरता, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मनातील भीती, दहावी, बारावीच्या परीक्षेविषयी प्रतिकूल मत प्रकट होत असताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाने कोरोना काळातील परीक्षेबाबत ऑनलाइन सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी विद्यार्थी-शिक्षकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे. जवळपास तीन हजार जणांनी या सर्वेक्षणात आपले मत नोंदवले, असे परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
कोरोनाबाबत सुरक्षितता पाळून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस देणे, विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करणे आणि परीक्षा केंद्रावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करून आवश्यक ती सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध केल्यानंतरच
परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक व अन्य नागरिकांनी मांडलेल्या मतांचा विचार करून परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
जून महिन्यात परीक्षा घेण्याचे मत 42 टक्के लोकांनी, 33 टक्के लोकांनी जुलै महिन्यात, तर 24 टक्के लोकांनी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे मत नोंदवले आहे.
परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे मत 61.9 टक्के लोकांनी मांडले, तर 38.1 टक्के लोकांनी नुकसान होईल असे मत नोंदवले आहे.