अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता शहरात खासगी रुग्णालयांकडून सर्व सामान्य रुग्णांची लूट तात्काळ बंद करावी तसेच बील तपासणी समित्यांनी फक्त बील तपासणीची औपचारीकता पुर्ण न करता यापुर्वी सामान्य रुग्णांकडुन जास्तीचे घेतलेले पैसे परत करुन या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे शिर्डी येथे पार पडलेल्या बैठकीत केली.
याबाबत त्यांना सविस्तर निवेदनही देण्यात आले.दिलेल्या निवेदनात डॉ. पिपाडा यांनी म्हटले आहे,राहात्यातील खाजगी कोविड सेंटरकडून ज्यादा दराने रुग्णांकडून बिलांची आकारणी सुरू आहे.
परंतु शासनाच्या कचाट्यात चौकशीत सापडु नये म्हणुन रुग्णांना बीलेच देत नाहीत. शासनाच्या कुठल्याही नियमांचे पालन करत नाहीत. सर्व सामान्य जनतेच्या आजारपणाचा गैरफायदा घेवुन लुट करणा-याला शासनाने धडा शिकवण्याची गरज आहे.
कोविड सेंटरकडुन होणा-या लुटी संदर्भात जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर चीड निर्माण झाली आहे.कोरोना काळात रुग्णांना आर्थिक परिस्थिती खराब असताना घरातील सोने-नाणे विकून या डॉक्टरांनी जास्तीची केलेली बिले भरावी लागत आहेत.
शासनाने रुग्णांची होत असलेली लूट थांबविण्यासाठी फक्त समित्या न करता व थातुरमातुर तपासणी न दाखवता प्रत्यक्षात कार्यवाही करुन या खाजगी कोविड सेंटरवर गुन्हे दाखल कऱण्यात यावे.