कर्तव्यात कसूर असलेल्या तलाठी व मंडलधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे मुरुम-मातीचे बेकायदा उत्खनन करून चोरी केल्या प्रकरणी तलाठी व कुकाणा मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी नंदिवाला समाजाचे लोक व जेऊर हैबती ग्रामस्थ यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

तसेच सदरच्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत आपण स्वतः चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

असे झाली नाही तर नंदिवाला समाजाचे लोक व जेऊर हैबती ग्रामस्थ दि.14 जुलै रोजी कुकाणा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करतील असा इशारा नंदीवाले समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

दरम्यान तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हास मौजे जेऊर हैबती येथे घरकुले दिलेली असून त्या घरकुलाची नोंद गावचे रेकॉर्डला झालेली आहे.

आमच्या समाजाचे देवस्थान म्हणून रामबाबा यांचे मंदीर हे घुगरे वस्ती-म्हस्के वस्तीच्या जवळ नदीच्या तीरावर जुने मंदीर असून सदरची जागा ही इनाम आहे. महसुल कर्मचारी हे उत्खनन करणारेचे लाभात गोलमाल रिपोर्ट व पंचनामा करीत आहेत.

महसुलचे कर्मचारी सदरच्या घटनेबाबत कुठलीही कारवाई करत नाहीत. महसुल कर्मचारी गाव कामगार तलाठी व मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत ताबडतोब निलंबित करावे व सदरच्या अवैध गौण खनिजाचे उत्खननाबाबत

आपण स्वतः चौकशी करुन कारवाई करावी तसे न केल्यास नंदिवाले समाजाचे लोक व ग्रामस्थ हे दि.14 जुलै रोजी कुकाणा येथे रास्तारोको आंदोलन करतील. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24