अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-कुरानमधील 26 आयत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगत ही 26 आयत हटवण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
यामुळे शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे.शिया आणि सुन्नी दोन्ही समुदायाच्या लोकांकडून रिझवी यांचा जोरदार विरोध होतोय.
याच दरम्यान वसीम रिझवी यांचं मुंडकं छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.मुरादाबाद बार असोसिएशनचे अध्यक्ष अमीरुल हसन जाफरी यांनी वसीम रिझवी यांचं मुंडकं छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केलीय.
दरम्यान रिझवी यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून देशाची शांतताही भंग केली आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी,
अशी मागणी अहमदनगरमधील मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. समाजातर्फे समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली.
त्यांनी म्हटले आहे की, ‘रिझवी यांनी कुराणच्या आयतचा चुकीचा अर्थ काढून आपल्या अज्ञानाचे व मानसिक संतुलन बिघडल्याचे दर्शन घडविले आहे.
रिझवी यांनी कुरान मधील २६ आयत दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचे चुकीचे आरोप करीत ही आयात कुराणमधून काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यामुळे देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. रिजवी यांनी कुराणबद्दल चुकीचा संदेश पसरवून जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायलयानेही यावर योग्य तो निर्णय लवकर घ्यावा.
रिझवी यांनी देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावून देशात शांतता व कायदा सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.’