सैनिक बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने भ्रष्टाचारी कर्मचार्‍या बरोबर अर्थपूर्ण संबंध ठेवत त्यांना पाठशी घातल्याने संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे व विनायक गोस्वामी यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी सदाशिव फरांडे यांनी संजय गांधी निराधार योजनेतील रक्कम हडप केली आहे. तसे दोन गुन्हे कर्जत पोलीस स्टेशनला दाखल आहे.

मात्र संबंधित कर्मचारी यांच्यावर संजय गांधी प्रकरणात दोन गुन्हे दाखल होऊनही संचालक मंडळ यांनी फरांडे यांना पाठीशी घालत त्यांच्यावर बँक सेवा नियमानुसार अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही.

याबाबत सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे अरुण रोडे, गोस्वामी यांनी जानेवारी महिन्यात स्मरण पत्र अनव्ये तक्रार केली असता, बँकेने सदाशिव फरांडे यांच्यावर कारवाई करण्याचा संचालक मंडळाने 31 डिसेंबर 2020 रोजी ठराव क्र. 17 अन्वये पास केला असल्याचे पत्र सहकार आयुक्त यांना दिले.

मात्र अद्यापही कसलीही प्रत्यक्षात कारवाई केली नसल्याची तक्रार विनायक गोस्वामी, अरुण रोडे यांनी पुन्हा केली आहे. सदाशिव फरांडे हे गेली 10 वर्षांपासून कर्जत शाखेत कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनी कर्जत शाखेत अनेक घोटाळे केले आहेत.

असे असतानाही संचालक मंडळ त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांची बदली केली जात नाही. इतर कर्मचारी यांच्या वर्षाला बदल्या केल्या जातात मात्र गैरव्यवहार, अपहार करणार्‍या कर्मचार्‍यांना 9 ते 10 वर्ष एकाच ठिकाणी ठेवत त्या कर्मचार्‍यांच्या गैरकारभाराला संचालक मंडळ खतपाणी घालत असल्याचा

आरोप रोडे यांनी केला आहे. त्यामुळे शासकीय रक्कम हडप केल्याप्रकरणी संचालक मंडळावर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात यावी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे, बँकेचे सभासद विनायक गोस्वामी यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24