अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल पावणेचारशे करोना बाधित मुलं आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुलांमधील करोनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे.
करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, बाधितांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण लक्षणीय असल्याने ती धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १ हजार ८५१ करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी सुमारे पावणेचारशे रुग्ण १८ वर्षांच्या आतील आहेत. त्यातही सात ते १४ वयोगटातील मुलांचे प्रमाण लक्षणीय असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सुमारे दीड महिन्यानंतर नगर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. रुग्णालयातील गंभीर रुग्णांसोबतच कोविड केअर सेंटरमधील खाटाही रिकाम्या होताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात साडेचार हजारांवर गेलेली दैनंदिन रुग्णांची संख्या आता दोन हजारांच्या आत आली आहे.
गेल्या २४ तासांत १ हजार ८५१ नवे रुग्ण आढळून आले. चौदापैकी पाच तालुक्यांतील रुग्ण संख्या दोन अंकी आहे. सर्वाधिक २२० रुग्ण संगमनेर तालुक्यात आहेत. पारनेर, अकोले, नगर तालुका, श्रीगोंदा येथील दीडशेहून अधिक रुग्ण आहेत.
नगर शहरातही कमालीची घट झाली असून आज १३२ नवे रुग्ण आढळून आले.असे असेल तरी नव्या बाधित रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. १ हजार ८५१ पैकी सुमारे पावणेचारशे रुग्ण १८ वर्षांच्या आतील आहे.
१ वर्षाच्या बालकालाही करोनाची लागण झाल्याचे दिसून येते. सर्वाधिक रुग्ण ७ ते १४ या वयोगटातील आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण कमी तीव्रतेची लक्षणे असलेले आहेत. गंभीर रुग्ण जवळपास नाहीत. असे असले तरी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
सध्या कडक लॉकडाऊन असला तरी खेळण्यासाठी आणि अन्य कारणांसाठी मुले बाहेर पडण्याचे, एकत्र मिसळण्याचे प्रमाण अधिक आहे. कुटुंबातील सदस्य अगर अन्य ठिकाणांहून संसर्गाची लागण झाल्याने मुलांमार्फत त्याचा प्रसार होत असल्याची शक्यता नाकारात येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.