अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून आरोग्य विभाग व प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी केली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची तयारी करतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत्या रुग्णांची काळजी घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी केलेल्या उपाय योजनांतून दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र आरोग्य विभागाकडून तिसऱ्या लाटेचा ईशारा दिलेला असल्यामुळे प्रशासन तिसऱ्या लाटेची तयारी करीत आहे.
परंतु काही दिवसांपासून दुसऱ्या लाटेतील बाधित रुग्णांचा आकडा काहीसा वाढला आहे.त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करीत असतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत असलेल्या रुग्णससंख्येकडे देखील गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
त्यासाठी एसएसजीएम महाविद्यालयात सुरू असलेल्या १०० ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरच्या जवळच कोविड केअर सेंटर सुरू करून बाधित रुग्णांवर उपचार करावेत व योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आमदार काळे म्हणाले.