अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शहरातील घास गल्लीत अनेक वर्षापासून व्यवसाय करणार्या हॉकर्सवर मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्यावतीने कारवाई होत असून, सदर कारवाई थांबविण्याची मागणी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
हॉकर्स बांधवांनी महापालिकेत जाऊन आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी साहेबान जहागीरदार, इरफान मेमन, सुभाष बायड, सुफियान शेख, कमलेश जव्हेरी, शमशुद्दीन शेख, गफ्फार शेख, हमजा शेख, फारुक शेख, तारीख तांबोली, राजू खाडे, दत्ता शिंदे आदिंसह हॉकर्स उपस्थित होते.
घास गल्लीत अनेक वर्षापासून हॉकर्स (पथविक्रेते) कपडे तसेच विविध वस्तूंची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे. दि.14 मार्च रोजी घास गल्ली येथे एका दुकानदार व रिक्षा चालक यांच्यात भांडण होऊन मारामारी झाली. या संदर्भात कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हे देखील दाखल झाले.
या प्रकरणाशी हॉकर्स व्यावसायिकांचा काहीही संबंध नसताना, काही जातीयवादी संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या भांडणाला जातीयवादी वळण दिले आहे. यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाने या भागातील हॉकर्सचे लावण्यात आलेल्या गाड्या काढून घेण्यासाठी कारवाई सुरु केली असून, या भागात व्यवसाय करण्यास मज्जाव केला जात आहे.
या प्रकरणामुळे कोणताही संबंध नसताना गोरगरीब हॉकर्सचे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. साहेबान जहागीरदार म्हणाले की, रिक्षाचालक व दुकानदार यांच्या भांडणात हॉकर्सना टार्गेट केले जात आहे. काही जातीयवादी संघटना या भांडणाला जातीय रंग देत असून, शहराची शांतता भंग केली जात आहे.
सर्व हॉकर्स मनपाची रितसर पावती फाडून दररोज आपल्या गाड्या लावतात. कोरोनाच्या संकटातून हॉकर्स सावरत असताना त्यांच्यावर चुकीच्या पध्दतीने कारवाई करणे चुकीचे आहे. कापडबाजारात मोठ्या प्रमाणात पक्क्या बांधकामांचे अतिक्रमण आहेत.
तर काहींनी परवानगी न घेता बांधकाम केलेले आहे. मोठ्यांचे अतिक्रमण सोडून गोरगरीबांना त्रास देण्याचा प्रकार मनपा प्रशासनाने थांबवावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.