ताज्या बातम्या

तब्बल १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाने खरेदी केली ‘एअर इंडिया’

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी टाटा सन्स या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. एअर इंडियासाठी १८००० कोटीची बोली टाटा समूहाने लावली.

अखेर आज शुक्रवारी केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती.

तर १९५३ मध्ये कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आता सात दशकांनंतर पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या.

त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटदेखील स्पर्धेत होते. यामध्ये टाटा सन्सने बाजी मारली असून एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेली आहे. टाटा समूहाने एअर इंडियासाठी १८ हजार कोटींची बोली लावली.

डिसेंबरच्या अखेरीपर्यंत एअर इंडियाच्या हस्तांतराचा व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे आणि नागरी उड्डान मंत्रालयाचे सचिव राजीव बंसल यांनी दिली.

६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे

एअर इंडिया पूर्वी टाटा समूहाची कंपनी होती. या कंपनीची स्थापना जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये केली होती. स्वातंत्र्यानंतर उड्डाण क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण झाले आणि त्यामुळे सरकारने टाटा एअरलाइन्सचे ४९ टक्के शेअर्स खरेदी केले.

त्यानंतर ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि २९ जुलै १९४६ रोजी कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले.

१९५३ मध्ये सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि कंपनीचे संस्थापक जेआरडी टाटा यांच्याकडून मालकी हक्क विकत घेतले. यानंतर, कंपनीला पुन्हा एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे नाव देण्यात आले. आता ६८ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा समूहाने स्वतःची कंपनी परत मिळवणार आहे.

Ahmednagarlive24 Office