Tata Sierra Lunch : लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने एकेकाळी रस्त्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या टाटा सियारा SUV चं इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) सादर केलं आहे. दिल्ली आणि ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सियाराच्या EV व्हर्जनने उपस्थितांचे लक्ष वेधले आहे. सियाराचा हा नवा अवतार जुन्या सियाराची आठवण करून देणारा आहे, मात्र त्याला आधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्सची जोड देण्यात आली आहे.
टाटा सियाराच्या पुनरागमनामुळे टाटा मोटर्सने आपल्या वारशाला आधुनिक टेक्नॉलॉजीसह नव्या उंचीवर नेलं आहे. सियारा EV ही फक्त इलेक्ट्रिक SUV नाही, तर ती जुन्या आठवणी आणि नवीन युगातील प्रगत तंत्रज्ञानाचा मेळ साधणारी कार ठरणार आहे.
टाटा सियारा EV : डिझाइन आणि वैशिष्ट्ये
नव्या सियाराच्या डिझाइनमध्ये जुन्या सियाराची झलक दिसते. मागील बाजूची खिडकी, चौकोनी चाकांच्या कमानी आणि उंच बोनेट यामुळे जुन्या मॉडेलचा क्लासिक लूक राखला गेला आहे. सियारा चमकदार पिवळ्या रंगात सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसते.
सियारा EV च्या आतील बाजूस तिन्ही स्क्रीन आहेत:
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सेंट्रल इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, पॅसेंजर साइड टचस्क्रीन, सियारा 4-सीटर आणि 5-सीटर लेआउटमध्ये उपलब्ध असेल. प्रीमियम साउंड सिस्टम, पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, अँड्रॉइड ऑटो, आणि ऍपल कारप्ले यांसारखी फीचर्स देखील यात समाविष्ट असतील.
इंजिन आणि परफॉर्मन्स
सियाराच्या ICE (Internal Combustion Engine) व्हर्जनमध्ये 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे, जे 170hp पॉवर आणि 280Nm टॉर्क जनरेट करू शकते. डिझेल व्हर्जनमध्ये 2.0-लीटर डिझेल इंजिन असेल, ज्यामध्ये 170hp पॉवर आणि 350Nm टॉर्क असेल. EV व्हर्जनची किंमत पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनच्या आधी जाहीर होईल.
सुरक्षा आणि ADAS टेक्नॉलॉजी
सुरक्षेच्या दृष्टीने, सियारामध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), आणि स्तर 2 ADAS (Advanced Driver Assistance System) असेल. या फीचर्समुळे सियारा केवळ स्टाइलिशच नाही तर सुरक्षित देखील ठरेल.
किंमत
सियाराची इलेक्ट्रिक आवृत्ती या वर्षाच्या उत्तरार्धात बाजारात येणार आहे. वृत्तानुसार, पेट्रोल आणि डिझेल आवृत्तीचे लॉन्च यावर्षीच्या अखेरीस होईल. EV व्हर्जनची अपेक्षित किंमत अजून उघड झालेली नाही, मात्र ती प्रिमियम SUV श्रेणीत असण्याचा अंदाज आहे.