अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- येथील नगर औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी शिवारात अज्ञात तीन चोरट्यांनी लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या ट्रकचालकास कोयता आणि चाकूचा धाक दाखवत ट्रकचालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीजवळील चार हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन चोरी केल्याची घटना घडली होती. या भामट्यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
संदीप दिलीप कदम, शशिकांत सावता चव्हाण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.४ मार्च २०२१ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्यादी ज्ञानेश्वर किसन गजरे यांनी फिर्यादी दिली की, ते स्वत: व त्यांचा मित्र किरण गायकवाड हे दोघेजण ट्रक (क्र.एमएच १६ सीसी ०८६१) मधुन ओरीसा येथे नेसकॉफी घेवुन जात होते.
दरम्यान पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद हायवेवरील शेंडी शिवारात थांबले असतांना तिन इसम एका काळया रंगाच्या विना नंबरच्या पल्सर मोटारसायकलवर तेथे आले. त्यातील दोघेजन ट्रकच्या केबीनमध्ये घुसले व त्यांच्या हातातील कोयता व चाकु फिर्यादी गजरे यांच्यावर उगारुन त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत, त्यांच्या मित्राजवळील ४ हजार रूपये रोख रक्कम व त्यांचे दोन मोबाईल फोन असा एकुण ४६ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.
त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान सदर गुन्ह्याचा तपस सपोनि वाय.यु.आठरे हे करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरची जबरी चोरी करणारे चोरटे शेंडी चौक येथे येणार आहेत. त्यानुसार आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, पोना.महेश दाताळ, पोना.शाबीर शेख, पोहेकॉ.युवराज गिरवले, पोहेकॉ.संदीप खेंगट पोशि.शिंदे आदींच्या पथकाने संदीप दिलीप कदम (वय २५ वर्षे रा.डोंगरगण ता.जि.अहमदनगर),
शशिकांत सावता चव्हाण,( वय २२ वर्षे रा.आंबीजळगाव ता.कर्जत जि.अ.नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल व कोयता मिळुन आल्याने त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. एकजण पसार असून त्याच्या मागावर पोलिस आहेत. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एन.कणसे करत आहेत.