अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- राज्यभर बीडीएस प्रणाली बंद असल्याने पीएफ धारक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, हक्काच्या पैशापासून वंचित होते, त्यासाठी आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी पाठपुरावा केला.(Teachers will get their dues)
त्यानुसार आता बीडीएस प्रणाली सुरू झाली असून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
गाडगे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना मागणीचे निवेदन देऊन पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याला यश आले असून आता ऑनलाइन देयकाची बीडीएस प्रणाली सुरू झाली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैयक्तिक कामे, मुलांच्या लग्नांसाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी,
गृह कर्ज हफ्ता भरण्यासाठी स्वतःच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून पैसे मिळण्याबाबत अर्ज केलेले होते, मात्र राज्यभर बीडीएस प्रणाली बंद असल्याने त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नव्हते.
ही प्रणाली सुरू झाल्याने शिक्षकांचे अनेक प्रश्न सुटतील. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षक वर्गात स्वागत होत आहे, असे गाडगे यांनी सांगितले.