अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- काेरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तालुका प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी दिला.
तालुक्यात रविवारी व सोमवारी, दोन दिवसांत सुमारे ३०९ व्यक्तींना काेरोना संसर्ग झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले. तालुक्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.
सर्वसामान्यांबरोबरच राजकीय पदाधिकाऱ्यांनी काेरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी यासंदर्भात प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले.
तालुक्यात दिवसेंदिवस काेरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
लग्न समारंभ, वाढदिवस अशा खासगी कार्यक्रमांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. खासगी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येते.
तेथील उपस्थित नियमानुसार आहे किंवा नाही याचीही प्रशासनाकडून खातरजमा केली जाते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी कमीत कमी उपस्थित लग्न व इतर समारंभ करावे लागतील, हे आता स्वीकारले आहे.
गेल्या दोन, तीन दिवसांत झालेल्या खासगी कार्यक्रमात काेरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे, उपस्थितीच्या मर्यादेचे काटेकोर पालन झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे तहसीलदार देवरे यांनी म्हटले.