अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असताना आरोग्य अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या व त्यांच्यावर दमबाजी करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशा तक्रारी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असल्याने याची गंभीर दाखल तहसीलदारांनी घेतली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंध लसीसीच मागणी वाढली आहे.
यामुळे आपल्याला लस मिळावी यासाठी काही पुढारी मंडळी आपल्या पदाचा गैरफायदा घेत आरोग्य कर्मचाऱ्यांना दमबाजी करत आहे. लसीकरणाबाबत वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव तसेच दमबाजी करणे,
असे प्रकार घडल्याबाबतच्या तक्रारी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी केल्या आहेत, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. उपलब्ध लसीचे प्रमाण मर्यादित असल्याने लसीकरण पूर्ण होण्यास वेळ लागत आहे.
तरी नागरिकांनी लसीकरणादरम्यान सहकार्य करावे, वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना सहकार्य करावे. लसीकरण प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.
दरम्यान नगर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी उपलब्ध असून, नागरिकांना लसीकरण सुरळीतपणे सुरू आहे.
जिल्हा परिषदमार्फत ज्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होतात, त्यानुसार ग्रामपातळीवर नियोजन करून नागरिकांना तत्काळ लस देण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत करण्यात येते.