अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- राज्यात काल सोमवारी सर्वत्र आदिवासी दिन साजरा केला जात असताना अकोले तालुक्यात मात्र आदिवासी व श्रमिकांनी आक्रमक आंदोलन केले.
रेशन, रोजगार, शिक्षण व वेतनाच्या मूलभूत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तहसीलदार कार्यालयात नसल्याने आक्रमक आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयाचे गेट आणि पोलिसांचे कडे तोडून थेट कक्षात जाऊन ठिय्या दिला.
अधिकारी आल्याशिवाय येथून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. आपल्या विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर आदिवासी, कामगार, कर्मचारी, निराधार व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी दोनशे श्रमिकांनी आंदोलन सुरू केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांनी आदिवासी व श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. आंदोलन सुरू असताना तहसीदार एका खासगी कार्यक्रमाला निघून गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे शांततेत सुरू असलेले आंदोलन चिघळले. त्यांनी तहसीलदारांच्या कक्षाकडे धाव घेतली. आंदोलकांनी तहसील कार्यालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला.
पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमानता आंदोलक थेट कक्षात शिरले. तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अधिकारी येईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले . या मागण्यांची प्रशासनाने तड न लावल्यास ११ ऑगस्टला पुन्हा मोर्चा काढून तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.