अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना १ मेपासून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना निर्णयाची घोषणा केली. केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यामुळे वय वर्ष ४५ खालील लोकांना केंद्र लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे.
कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे, असे नवाब मलिक म्हणाले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल.
सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून, जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. मागच्या कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली.
यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जाहीर केले आहे.
मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली. १७ राज्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
देशातील मध्य प्रदेश, जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, गोवा, केरळ, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगना, हरयाणा या राज्यांनी यापूर्वीच मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे.