अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- जळगाव : माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली आहे.
येत्या १० दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत.
बीकेसीमध्ये 2 हजार 400 बेडपैकी 800 बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये 750 बेड आहेत पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही. नेस्को सेंटरमध्ये 2 हजार बेड्सपैकी 900 बेड भरले आहेत.
याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे.
तर सोमय्या यांच्या या इशाऱ्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे प्रत्युत्तर देत म्हणाले की, अशाप्रकारचा सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो आपल्या खिश्यात कोरोना घेऊन फिरायला लागला आहे.
आली की टाकली पुडी खिशात… आली की टाकली पुडी खिशात… कोरोना काय कमाईचं साधन आहे का? असा सवाल पाटील यांनी केला आहे. कोरोनावरुन काहीही बोलायचं आणि कोणतेही आरोप करायचे असा प्रकार सध्या सुरु आहे.
सोमय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन आहे का? कोरोना काळात लोक सेवाभावी वृत्तीने लोक शासनाला मदत करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी सोमय्या यांना दिलाय