अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारले जात आहे. त्याचसोबत नागरिकांच्या सोईसाठी व्यापारी संकुलाचीही निर्मिती करण्यात येत आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमदार पवार विविध विकासकामांच्या माध्यमातून नवे आयाम देत आहेत. मंगळवारी जामखेड येथील बहुप्रतिक्षित बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची मीमांसा केली जाते. मागील सरकारच्या काळात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आश्वासने दिली होती.
मोठ्या घोषणा केल्या होत्या, मात्र आपल्या १० वर्षाच्या कार्यकाळात, त्यातही ५ वर्ष मंत्रीपद असतानाही जामखेडच्या प्रलंबित बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आले. आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात आपल्या कार्यकर्तृत्वाचा नवा पायंडा स्थापित करून विकासकामांचा धडाका लावला आहे.
आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात सुरू केलेल्या विकासाच्या निर्णायक कृतिकार्यक्रमांमुळे मतदारसंघातील नागरिकांना नवी दृष्टी दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी लोकांच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून राजकीय इच्छाशक्ती आणि कृतीशील आचरणातून राज्यभरातील लोकप्रतिनिधींसमोर नवा आदर्श स्थापित करण्याचे काम केले आहे.
मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने जामखेड शहरातील बस स्थानक कात टाकत आहे. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून जुन्या बस स्थानकाच्या जागी दहा प्लॅटफॉर्म असलेले भव्य असे सर्वसुविधा संपन्न बस स्थानक उभारले जाणार आहे.