अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले व कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयूमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध नसलेल्या भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे व शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले.
पैसा कमविण्यासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळणारे डॉ.म्हस्के दांम्पत्यांवर कारवाई न झाल्यास दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिनी हॉस्पिटल समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलमध्ये किशोर मारुती भिंगारदिवे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदर पेशंटला आयसीयूमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.
या हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ.किशोर म्हस्के व कौशल्या म्हस्के यांनी रुग्णासाठी हॉस्पिटलच्या मेडिकल मधून रेमडेसिविर इंजेक्शन आनण्यास सांगितले. मेडिकलमध्ये इंजेक्शन मागितला असता सदर इंजेक्शनची किंमत 20 हजार रुपये सांगण्यात आली.
हे इंजेक्शन एवढे महाग नसल्याचे सांगितले असता, मेडिकल चालकाने डॉक्टरांची भेट घेण्यास सांगितले. डॉक्टरांनी देखील हे इंजेक्शन इतरांच्या तुलनेत स्वस्त भेटत असल्याचे स्पष्ट केले.
मात्र अजून इंजेक्शन लागणार असल्याचे व आर्थिक परिस्थिती नसल्याने इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. डॉक्टर व मेडिकल चालकांना पैसे कमी करण्याची विनंती करुन देखील त्यांनी काही ऐकून घेतले नाही.
शेवटी सदर रुग्ण दगावला. अशा पध्दतीने आनखी काही रुग्ण या हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. म्हस्के डॉक्टर दाम्पत्यांनी पैसे कमावण्याच्या नादात रुग्णांचा जीव दिला.
सदर प्रकरणी नातेवाईकांनी जाब विचारला असता उलट हॉस्पिटल प्रशासनाने दमबाजी केली असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळा बाजार करणारे व सोयी-सुविधा न देता अनेक कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणार्या डॉ. म्हस्के दांंम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.