अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याशी जवळीक साधलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचा पक्षाने राजीनामा घेतला आहे आणि तडकाफडकी हा राजीनामा मंजूरही करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कर्जत येथील भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी त्यांच्या खासगी संस्थेत रोहित पवार यांना निमंत्रित करून एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर दोन दिवसांतच ही कारवाई झाली आहे. आता ढोकरीकर पुढे काय भूमिका घेणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड लक्षणीय ठरत आहे.ढोकरीकर यांनी आमदार पवार यांच्याशी साधलेली जवळीक असल्याचे सांगण्यात येते. ढोकरीकर यांचे कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू गावात धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे.
या विद्यालयामध्ये व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. ढोकरीकर पूर्वी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जात. मात्र या कार्यक्रमास त्यांनी शिंदे यांना निमंत्रित केले नव्हते. उलट राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर भाजपकडून पुढील हालचाली झाल्या. रोहित पवार यांनी कर्जत आणि जामखेड तालुक्यात आतापर्यंत भाजपसह इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत आणण्यात यश मिळवलं आहे. ढोकरीकर हे तालुक्यातील भाजपच्या दुसऱ्या फळीतील सक्रीय कार्यकर्ते होते. निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होत असे.