अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार असतात, जे एखाद-दुसऱ्या चित्रपटानंतर अचानक इंडस्ट्रीपासून दूर निघून जातात. मात्र त्या एखाद-दुसऱ्या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळालेली असते.
अशीच एक कलाकार आहे, ती म्हणजे झनक शुक्ला. ‘कल हो ना हो’ हा बॉलिवूडमधील अभिनेत्री झनक शुक्ला आणि शाहरुख खान यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीची मोठी चर्चा झाली होती.
त्यावेळी झनक केवळ सात वर्षांची होती. मात्र इतक्या लहान वयात तिनं केलेला अभिनय पाहून शाहरुख देखील अवाक झाला होता. एक दिवस ती मोठी अभिनेत्री होणार अशी भविष्यवाणी देखील त्यानं केली होती.
मात्र शाहरुखची ही भविष्यवाणी खोटी ठरली. झनकनं अवघ्या 25 व्या वर्षीच सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली आहे. याबाबत झनक म्हणाली, “मी अभिनयाला कंटाळले नाही.
पण माझ्या बालपणातील बराच वेळ हा कामात गेलाय. त्यामुळे मला त्याचा आनंद घेताच आला नाही. तू आता ब्रेक घे, असं माझे आईवडील सांगतात. त्यामुळे मी सध्या शिक्षणावर माझं लक्ष केंद्रीत करतेय.
सध्या मी काही कमवत जरी नसले तरी मी खूप समाधानी आहे. मी जेव्हा लहान होते, तेव्हा मी विचार करायचे की २४ वर्षांचे झाल्यावर मी खूप पैसे कमवेन, लग्न करेन आणि खूश राहीन.
आता मी २५ वर्षांचे झाले आहे आणि काहीच कमवत नाहीये. पण माझे आईवडील मला खूप साथ देतात”, असं ती या व्हिडीओत म्हणते. झनक ही अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे.
वयाच्या सातव्या वर्षी तिने पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटात काम केलं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कल हो ना हो’ हा तो चित्रपट होता. याशिवाय तिने सोन परी, हातिम यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय.