अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- मागील महिन्यापासून जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या.
रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी केली. मात्र तरीही विनामास्क फिरणार्या नागरिकांची संख्या वाढल्याने प्रशासनाने अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत प्रशासनाने ही कार्यवाही अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक २० फेब्रुवारीपासून ते दिनांक ३ मार्चपर्यंत मास्क न वापरणार्या १० हजाराहून अधिक जणांवर दंडात्मक कार्यवाही करुन तब्बल ११ लाख ३६ हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे आदींबाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले.
याशिवाय, गर्दी टाळण्याचेही आवाहन केले. नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिकांना निर्देश दिले.
त्यानुसार जिल्ह्यात नियम मोडणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. दिनांक २० फेब्रुवारी ते ०३ मार्च या कालावधीत लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अशा ९५७ ठिकाणी तपासणी करण्यात आली.
त्यापैकी १९१ ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करुन २ लाख ४ हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच मास्क न वापरणार्या १० हजार १५० जणांकडून ११ लाख ३६ हजार सातशे रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.