अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोना संकटात राज्यात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रशासनाच्या सहकार्याने औरंगाबाद, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात कोरोना काळात आतापर्यंत ७० बालविवाह रोखले आहेत.
कोरोना काळात मुलींचे शिक्षण थांबले. त्यामुळे मुलींचे लग्न करून टाका, हीच मानसिकता काही पालकांमध्ये निर्माण झाली आहे. कोरोना काळात सर्वच गोष्टी मर्यादित झाल्या. कोरोनाच्या आधी एखाद्या गावात बालविवाह होणार असल्याची माहिती तत्काळ मिळायची.
मात्र, आता विवाह सोहळ्यांसाठी मर्यादा आल्याने अनेकांनी गुपचूप बालविवाह उरकले. सन २०१६ ते आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अहमदनगर, औरंगाबाद, जालना, ठाणे, उस्मानाबाद, पुणे,
नाशिक आणि बीड या जिल्ह्यात साधारण २३५ बालविवाह रोखल्याची माहिती समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी दिली. कोरोना काळात बालविवाहाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने राज्यातील काही जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू असून, १३५ बालविवाह झाल्याचे त्या माध्यमातून समोर आले आहे. प्रत्यक्षात किती बालविवाह झाले? हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर समोर येईल.
माहिती उशिरा मिळाली, अथवा मिळालीच नाही. तसेच काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याने बालविवाह झाले, असेही ॲड. गवांदे यांनी सांगितले. बालविवाह रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रभावीपणे काम करत आहे.
मात्र, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण, सामाजिक न्याय आणि शिक्षण यांनी सतर्कता ठेवून बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.
तसेच बालविवाह पूर्णपणे रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायद्यात बदल व्हावा, अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने व्यक्त केली जाते आहे.