अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्या कि आंदोलनाचा पवित्र हाती घेतला जातो. आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी आपला आवाज शासनदरबारी पोहचवला जातो.
मात्र असेच एक आंदोलन आंदोलकांच्या अंगलट आले असून या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी 100 हुन अधिकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडला आहे.
कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्यावतीने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याच्या कामांचा निषेध केला होता.
यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, हे आंदोलन करताना कोरोना घटना व्यवस्थापक यांची परवानगी व शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता,
कोविड नियमांचे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी १३८ जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या दाखल गुन्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आय आणि मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार संजय पवार हे करीत आहे.