अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- जेऊर येथे महावितरण विरोधात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेले आंदोलन म्हणजे नौटंकी आहे, असा आरोप माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जेऊर येथील महावितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कर्डिले यांनी राज्य सरकारवर टीका करत महावितरण गलथान कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी तयार असल्याचे सांगितले होते.

माजी पंचायत समिती सदस्य मोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कर्डिले यांचे आंदोलन नौटंकी आहे. जनतेला तसेच दुसऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये पाठवणारे लोकांसाठी काय जेलमध्ये जाणार? ते जेलमध्ये नक्की जातील परंतु सामाजिक आंदोलनातून नव्हे तर त्यांच्या इतर कर्तृत्वाने.

सत्तेत असताना २५ वर्षात मंत्रालयात शेतकऱ्यांबद्दल ‘ब्र’ शब्द न उच्चारणाऱ्यांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. दूधवाले आमदार म्हणून घेणाऱ्यांनी दुधाचा प्रश्न सोडवला का? दूध प्रक्रियेचा एखादा उद्योग सुरू केला का? उलट दूध संघ बंद पाडला. सत्तेचा उपयोग स्वार्थासाठी करण्यात हे पटाईत होते.

यांना जनतेने ओळखले आहे. पुन्हा भविष्यात हे आमदार होणार नाहीत. यांच्या काळात एकही नवीन ट्रान्सफार्मर बसवला नाही. आम्ही प्रत्येक गावात नवीन ट्रान्सफार्मर दिले. ओव्हरलोड कमी करून दुपटीने क्षमता वाढवली. आम्ही नवीन रोहित्र मंजूर करून बसवतो म्हणून उद्घाटन करतो.

पण यांनी काहीच केले नाही. आजपर्यंत फक्त शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले. ते काय शेतकऱ्यांना न्याय देणार, अशी भूमिका मोकाटे यांनी स्पष्ट केली.