अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगावात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे
यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे राणेंच्या अटेकेसाठी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी जीभ घसरवून एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने आम्हा शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
हे वक्तव्य अशोभनीय असून लोकशाहीच्या विरोधात आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र व एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अमृतमहोत्सव हा शब्द आठवला नाही म्हणून नारायण राणेंची देशभक्ती जागृत झाली. मग उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या पार्थिवावर असलेल्या भारताच्या झेंड्यावर भाजपचा झेंडा टाकला गेला, तेव्हा ह्यांची देशभक्ती कुठे गेली होती.
निदर्शने करताना व निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, तालुकाप्रमुख विमल पुंडे, बाळासाहेब जाधव,
वाहतूकसेना उपजिल्हाप्रमुख, विकास शर्मा, भुषण पाटणकर, आकाश कानडे, बाळासाहेब साळुंके, योगेश मोरे, वैभव गिते, राहुल देशपांडे, सतीश शिंगणे, विभागप्रमुख समीर शेख, गौरव गुप्ता, वैभव हलवाई, वाहतूकसेनेचे अविनाश धोक्रट, पप्पू पेकळे, प्रवीण शेलार, किरण आडांगळे, सचिन जाधव, दत्तू लोणारी, संतोष लोणारी शिवसैनिक उपस्थित होते.