अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात वाळू साठ्यांचे लिलाव बंद आहेत. अवैध वाळू उपसा सुरू असला तरी जिल्ह्यात वाळूची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे परराज्यातून वाळूची आवक सुरू झाली आहे.
ही बाब लक्षात घेता परराज्यातून येणाऱ्या वाळूसाठी शासनाने एका परिपत्रकान्वये नियमावली जाहीर केली आहे. परराज्यातून आलेल्या वाळूची महाखनिज या संगणकीय प्रणालीत नोंद करणे आवश्यक राहील.
सदरची वाळू वैध मार्गाने आली का याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने गौण खनिज विभागाने १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी ई-निविदेची तिसरी फेरी जाहीर केली आहे. दरम्यान जिल्ह्यात आता परराज्यातून वाळू येऊ लागली आहे.
जिल्ह्यातील १८ वाळू घाटांचे लिलाव करण्यास राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. त्यापैकी तीन वाळू साठे शासकीय कामासाठी राखीव ठेवण्यात आले होते, तर लिलावाच्या पहिल्या फेरीत संगमनेर तालुक्यातील एका वाळू साठ्याचा लिलाव झाला. राहिलेल्या १४ साठ्यांसाठी दुसरी फेरी जाहीर करण्यात आली होती.
त्यामध्येही प्रतिसाद न मिळाल्याने आता प्रशासनाने तिसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे. १० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द, नायगाव, मातुलठाण, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण, संवत्सर, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द, पिंप्री वळण, चंडकापूर, वळण, रामपूर, सात्रळ, राहाता तालुक्यातील पुणतांबा, रस्तापूर येथील वाळू साठ्यांचा लिलाव होणार आहे.