अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- बँकेची 22 कोटी रुपयांचा आर्थिक फसवणूक प्रकरणातील पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केलेल्या नगरच्या तीन डॉक्टर यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहे.
या आरोपीमध्ये डॉ. भास्कर सिनारे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी वसंत बाबर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतील फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आत्तापर्यंत आठ जणांना अटक केलेली आहे.
यात नगरच्या तीन डॉक्टरांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आशुतोष लांडगे याच्या खात्यामध्ये अकरा कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले होते. त्यातील सहा कोटी चार लाख रुपये ही रक्कम या तीन डॉक्टरांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती.
ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या तीन डॉक्टरांना नगर येथून अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत 30 जून रोजी संपल्यानंतर त्या तीनही डॉक्टर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या तीनही आरोपींनी न्यायालयामध्ये वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. या जामीन अर्ज संदर्भामध्ये सुनावणी झाली असून न्यायालयाने या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.