अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- देशात शेअरमार्केट मध्ये अनेक जण गुंतवणूक करतात तसेच अनेकजण दररोज ट्रेडिंग करून चांगला नफा देखील कमावतात.
मात्र आता याच शेअरमार्केट संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने ट्रेडिंगबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
आता म्युच्युअल फंड कंपनीचे कर्मचारी, विश्वस्त आणि संचालक मंडळाचे सदस्य ट्रेडिंग करू शकणार नाहीत. सेबीने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात यामध्ये माहिती दिली आहे.
शिवाय हे निर्बंध अशा व्यक्तींवरही लागू होतील ज्यांच्याकडे कंपनीबद्दल कोणतीही माहिती आहे आणि त्यामुळे कंपनीचे निव्वळ मूल्य, मालमत्ता आणि युनिट धारकांचे हित प्रभावित होऊ शकते.
बाजार नियामकाने ‘ऍक्सेस पर्सन’ची एक श्रेणी तयार केली ज्यांच्यावर निर्बंध लागू होतील. ऍक्सेस पर्सन्समध्ये मालमत्ता व्यवस्थापन कंपनी चे कार्यकारी संचालक, मुख्य गुंतवणूक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी आणि इतर सी-सूट अधिकारी,
निधी व्यवस्थापक, डीलर्स, संशोधन विश्लेषक, ऑपरेशन विभागातील कर्मचारी, अनुपालन अधिकारी आणि प्रमुख यांचा समावेश होतो. अर्थात या संबंधित व्यक्ती म्युच्युअल फंडात ट्रेडिंग करू शकत नाहीत.
याबाबतच्या गाइडलाइन्समध्ये शेअर्स, डिबेंचर, बाँड, वॉरंट, डेरिव्हेटिव्ह आणि म्युच्युअल फंड/एएमसी द्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या यूनिट्सची खरेदी किंवा विक्रीचा व्यवहारांचा समावेश आहे.