अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- शहरात उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. चिमण्या वाचविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जन संसदच्या वतीने राष्ट्रीय बाल पक्षी चिमणी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अभियानाचे प्रारंभ धर्माधिकारी मळा येथे करुन राष्ट्रीय बाल पक्षी चिमणी म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तर फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारणार्यांना लोककर्कासूर घोषित करुन, तळतळाट काळी गुढी उभारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. लहान बाळांना असताना आई चिऊ, कावळ्याच्या गोष्टी व कविता ऐकवित असते.
मात्र मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे हे पक्षी, मधमाश्या, फुलपाखरे नामशेष होत असून, त्यांची संख्या झपाट्याने कमी झालेली आहे. हे पशु-पक्षी पर्यावरणाचे घटक असून, अशा मोबाईल टॉवरमुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. तर मनुष्य जीवनावर देखील विपरीत परिणाम होऊन आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या चुंबकीय लहरींची तीव्रता अधिक असून, याचे गंभीर परिणाम मनुष्यांना भोगावे लागणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
दाट लोकवस्तीच्या भागात मोबाईल टॉवर उभारण्याच्या विरोधात संघटनेने आंदोलन सुरु केले असून, याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय बाल पक्षी चिमणी अभियान सुरू करण्यात येणार आहे. धर्माधिकारी मळा परिसरात जागा मालक पैसे कमविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारत आहे.
तर पैसे घेऊन महापालिकेतील संबंधित अधिकारी त्याला परवानगी देत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. हे मोबाईल टॉवर उभारणारे लोककर्कासूर असल्याची घोषणा संघटनेच्या वतीने केली जाणार आहे. तर धर्माधिकारी मळा परिसरातील सर्व नागरिक या अभियानात सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या अभियानासाठी अॅड. कारभारी गवळी, धीरज तनपुरे, अनिल बोरा, गोरक्षनाथ दांगट, ललीता गवळी, मनिषा भोसले, मधुमती दांगट, योगिता शेटे, अनिता भंडारी, मिनल गोरे, संध्या पवार, शिल्पा कुलथे आदी प्रयत्नशील आहेत.