साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती भाजपाकडून निर्माण केली जातेय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रातला विरोधी पक्ष रोज उठून आज या मंत्र्याला घालवणार, उद्या त्या मंत्र्याची ‘विकेट’ पडणार” अशी वक्तव्ये करीत आहे. आज साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती निर्माण केली जात आहे.

राज्याची सत्ता त्यांना हवी आहे व त्यासाठी सध्या आहे ती घडी उलथवायची आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची विरोधकांची तयारी असेलही, पण ते जमेल असे दिसत नाही, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर पलटवार केला आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राचे सरकार अशा प्रकारे खिळखिळे करायचे या डावपेचात अशा संविधानिक संस्था सक्रिय होतात हे चिंताजनक आहे. केंद्रीय तपास यंत्रणा हातात नसत्या तर त्यांना ही अशी बेताल वक्तव्ये करण्याची हिंमत झालीच नसती.

राज्य बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता.

विरोधी पक्षाच्या हातात खरोखरच पुरावे होते म्हणून हल्ले केले. महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली तरी सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्य कर्तव्यच झाले आहे.

मुंबईचे उचलबांगडी केलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि वसुलीचे आरोप केले. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले.

यावर गृहमंत्री देशमुखांना नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. देशमुखांनी राजीनामा दिला.देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते हे मान्य केले तरी या आरोपांची सत्यता काय? खरेखोटे सिद्ध व्हायचे आहे.

परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावर कायम ठेवले असते तर हे वसुलीचे आरोप त्यांनी केले नसते. परमबीर यांनी पत्र लिहिले व खळबळ उडवून दिली, पण त्या पत्राचा प्रवास पाहता त्यांचा बोलविता आणि करविता धनी कोणी दुसराच आहे हे आता पटू लागले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24