अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- मध्य प्रदेश भाजपाचे राज्य प्रभारी पी. मुरलीधर राव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं असून यामुळे राजकारण तापलं आहे. पी. मुरलीधर राव यांनी “माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी” असं म्हटलं आहे.
यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानावर अनेकांनी टीकास्त्र सोडलं आहे. वादानंतर मात्र आता भाजपा नेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे.
याच दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील जोरदार टीका करत निशाणा साधला आहे.दरम्यान, राव हे नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात.
काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. प्रसारमाध्यमांनी भाजपा हा कधी ब्राह्मण-वाण्यांचा पक्ष होता,
तर कधी एससी, एसटी, ओबीसींचा पक्ष, असे का? तसेच आपण विकासाच्या गप्पा मारतो, मात्र जातीच्या नावावर मते का मागितली जातात? असा प्रश्न मुरलीधर राव यांना विचारण्यात आला होता.
त्यावर राव यांनी “माझ्या एका खिशात ब्राह्मण, दुसऱ्या खिशात वाणी आहेत. आता प्रश्न विचारला आहे, तर उत्तर ऐका. माझ्या व्होट बँकेत,
माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, माझ्या नेत्यांमध्ये ब्राह्मण आहेत, म्हणून त्याला ब्राह्मणांचा पक्ष म्हटले गेले. वाणी आहेत म्हणून वाण्यांचा पक्ष म्हटले” असं उत्तर दिलं आहे.