अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव असून सदर तरुणी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता होती.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वृषाली ही युवती दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ नंतर गवताला जाते म्हणून घराबाहेर पडली परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही.

त्यामुळे घरच्यांनी तिची शोधाशोध चालू केली. परंतु ती मिळून आली नाही. दरम्यान ती बेपत्ता झाल्याची फिर्याद श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली होती.

परंतु १७ सप्टेंबर रोजी सकाळी रमेश सुकदेव पवार हे शेतात जात असताना त्याच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानिकांना तसेच श्रीरामपूर ग्रामीण तालुका पोलिसांना दिली.

दरम्यान प्रथमदर्शी समजलेल्या माहितीवरुन सदर तरुणीचे लग्न जमत नसल्यामुळे नैराश्यातून हा प्रकार झाल्याचे समजते. वृषालीचे आई-वडील हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. वृषालीही मोलमजुरी करत होती. तिच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परीवार आहे.