अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- सुरेश एकनाथ गुलदगड या 70 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह त्यांच्याच राहत्या घरात आढळून आल्याची धक्कादायक घटना राहुरी शहरातील बिरोबा नगर परिसरात घडली आहे.
दरम्यान, त्यांच्या राहत्या बंद घरातून दुर्गंधी सुटल्याने लगतच्या नागरिकांनी ही घटना तातडीने राहुरी पोलिसांना सांगितली. त्यावरून राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून गुलदगड यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गुलदगड हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. बर्याच वर्षांपासून सेवानिवृत्त जीवन जगत होते.
राहुरी शहरातील बिरोबानगर परिसरातील शिक्षक बँकेच्या मागे त्यांचे घर असून काही दिवसांपासून ते एकटेच राहत होते. 9 मार्च रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती.
काही लोकांनी राहुरी पोलिसांना या घटनेची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडून पाहिले असता गुलदगड हे घरात जमिनीवर मृतावस्थेत पडलेले दिसून आले.
त्यानंतर गुलदगड यांचा मृतदेह बाहेर काढला. दुपारी उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर समोर येईल. सध्या राहुरी पोलिसांत याबाबत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.