Ahmednagar News : रेल्वेची तार चोरायला गेलेला मुलगा परत आलाच नाही ! शॉक बसून मृत्यू, मित्रांना पोलिसांकडून अटक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नगर बीड परळी रेल्वे मार्गावर नारायणडोह (ता. नगर) शिवारात रेल्वेची तांब्याची तार चोरायला गेलेल्या टोळीतील एका युवकाचा अतिउच्चदाब विजेचा शॉक बसून जागेवर मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे घडली आहे.

रोहित दत्तात्रय चौधरी ( वय २०, रा. रेणुका नगर, बोल्हेगाव ) असे मयत युवकाचे नाव आहे. त्याच्या साथीदारांनी प्रारंभी त्याचा मृत्यू बोल्हेगाव परिसरात झाला असल्याचा बनाव केला होता. मात्र तो बनाव असल्याचा पोलिस तपासात उघड झाला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून एमआयडीसी पोलिसांना शुक्रवारी (दि. २५) कळविण्यात आले की, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोल्हेगाव परिसरात विजेचा शॉक बसून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयातून आलेल्या अहवालानुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. तसेच त्या अनुषंगाने त्याच्या समवेत असलेल्या व्यक्तींचे जबाब घेत असताना त्यात विसंगती दिसून आली. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने बारकाईने तपास केला असता, बोल्हेगाव परिसरात शॉक बसून मृत्यू झाल्याचा बनाव उघड झाला.

मयत रोहित चौधरी यास जिल्हा रुग्णालयात आणणाऱ्या दोघांकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत त्या दोघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

नगर बीड परळी रेल्वे मार्गावर नारायणडोह (ता. नगर) शिवारात रेल्वे लाईनची तांब्याची तार दि. १९ ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.

या मार्गावर वारंवार तार चोरीला जात असल्याने रेल्वे प्रशासनाने तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. दरम्यान, चौधरी व त्याच्यासोबतचे इतर युवक तार चोरी करण्यासाठी शुक्रवारी (दि. २५) पहाटे गेले असता तेथे शॉक लागून चौधरी याचा मृत्यू झाला आहे.

त्याचा मृत्यू होताच त्याच्या सहकाऱ्यांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. तेथे चौधरी याला एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत बोल्हेगाव परिसरात विजेचा शॉक बसल्याची खोटी माहिती सांगितली. मात्र पोलिसांना शंका आल्यावर हा बनाव उघड झाला आहे.