अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील चिंचेच्या व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पितळ अखेर उघडे पडले आहे.
या अधिकाऱ्यांनी मर्जीतल्या व्यापाऱ्यांना हाताशी धरत गुपचूप उरकलेला २४ हजारांचा लिलाव तक्रारीनंतर पुन्हा घेतल्याने तब्बल सव्वादोन लाखांना गेला आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीत भर पडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, कोल्हार ते बेलपिंपळगाव दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतीत चिंचेची ५०हून आधिक झाडे आहेत.
दरवर्षी या झाडावरील फळांची विक्री लिलाव पद्धतीने करण्यात येते; मात्र कोरोना काळात या कार्यालयातील काही अधिकारी आणि काही कामगारांनी आपल्या मर्जीतील दोन- चार व्यापाऱ्यांना बोलावून लाखो रुपयांचा हा लिलाव अवघ्या काही हजारात देऊन आपले हात ओले केले होते.
लिलाव होण्याअगोदर इच्छुक अनेक व्यापाऱ्यांनी लिलावासंदर्भात विचारपूस करण्यासाठी या कार्यालयात हेलपाटे मारले; मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना हुसकावले. यानंतर व्यापाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री हसन मुश्रीफ,
संगमनेरचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तक्रार करत चिंच फळाच्या लिलाव प्रक्रियेत सर्व व्यापाऱ्यांना सामावून घेत लिलाव घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुनीर बागवान,
निसार बागवान, जाकीर हुसेन बागवान, राजू शिंदे, द्रोणा थोरात, रईस बागवान, युनूस बागवान, कय्युम बागवान, हुसेन बागवान, हसन बागवान, राजेंद्र शिक्रे, रवींद्र गायकवाड, हमीद आतार, शफीक बागवान, रियाज आतार, कासम बागवान, शाहरुख बागवान यांच्यासह इतर सुमारे २५ व्यापाऱ्यांनी दिला होता.
निवेदने हाती पडताच सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व कामगार खडबडून जागे झाले. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा लिलाव घेण्यात आला. अगोदर अवघ्या २४ हजारात दिलेला हा लिलाव सुमारे सव्वादोन लाख रुपयात गेला आणि येथील व्यापाऱ्यांनी दाखवलेली जागरुकता आणि सतर्कतेमुळे या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले.
लिलावावेळी काही व्यापाऱ्यांनी व्हीडीओ चित्रण करण्याचा प्रयत्न केला असता यावरून बांधकाम खात्यातील काही अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
चित्रीकरण करू नका, असा आग्रह अधिकाऱ्यांनी धरला. व्यापाऱ्यांचे मोबाइल हिसकवण्याचा प्रकार झाला; मात्र व्यापाऱ्यांच्या एकजुटीपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. या प्रकाराची सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.