अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नववधू इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला, अन् त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला.
आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच तिला मृत्यूने गाठलं व आनंदाच्या वातावरणावर एका क्षणात विरजण पडले. ओडिशाच्या सोनेपूर जिल्ह्यातील ही घटना घडली.
गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असं मृत नवरीचं नाव आहे. शुक्रवारी बालानगीर इथे राहणाऱ्या बिसीकेसन याच्यासोबत रोझीचं लग्न झालं. लग्नानंतर पाठवणीची वेळ आल्यापासूनच रोझीला रडू अनावर होत होतं. रडत असतानाच बेशुद्ध होऊन ती जमिनीवर कोसळली.
नातेवाईकांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तिच्या हाताची मालिश व तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तरीही ती न उठल्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.
गावातील एका व्यक्तीने सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे ती तणावात होती. तिच्या काही नातलगांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं.