अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- बैलगाडा शर्यतीवरून राज्यातील राजकारण पेटले असताना राज्य सरकारने अद्यापही या शर्यतींना परवानगी दिली नाही. प्रशासनाचा विरोध झुगारत अखेर सांगलीतील झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजिक केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणावर पोलिसांनी चरे मारले होते.
शिवाय त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र तरीही हि शर्यत पार पडली आहे. बैलगाडा शर्यतीला प्रशासनाने विरोध केल्याने गोपीचंद पडळकरांनी शर्यतीचे ठिकाण बदलत झरे-वाक्षेवाडीच्या हद्दीत शर्यती भरवल्याय. त्यामुळे पोलीस,
प्रशासनाची संचारबंदी, नाकाबंदी झुगारुन शर्यती भरवण्यात आल्या होत्या. एकूण ७ बैलगाड्यांची शर्यत लावून या शर्यतीची सुरुवात करण्यात आली. झरे- वाक्षेवाडीतील डोंगरावर झालेली शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींप्रमाणेच स्थानिक लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी गोपीचंद पडळगकरांनी ‘बैलगाडा शर्यतीबाबत सरकारं तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा बैलगाडीसह मंत्रालयावर मोर्चा काढू’ असा सरकारला इशारा दिला. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “राज्य सरकारनं बैलगाडा शर्यत सुरु करण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात बाजू ठामपणे मांडावी, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता.
तो या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करुन शेतकऱ्यांनी सरकारपर्यंत पोहोचवला आहे.” “बैलगाडा शर्यतींचं करण्यात आलेलं आयोजन हे शेतकऱ्यांनी यशस्वी केलेलं आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे. हे सर्व शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. 10 ते 15 किलोमीटर पायी प्रावस केला आहे.
पोलिसांचा आणि आमचा संघर्ष नाही. ते त्यांचं काम करत आहेत. सरकारनं त्यांना पुढं केलं आहे. आमचा हेतू हाच की, राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालावं आणि बैलगाडा शर्यत सुरु व्हावी. यामध्ये दुसरा कोणताच हेतू नाही.”