अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे.
संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात अवैध धंद्याने डोके वर काढले आहे. राज्यात गुटखा विक्री व उत्पादन करण्यास प्रतिबंध असतांनाही संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होत आहे.
आता या पाठोपाठ संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे दिसत आहे. दररोज तब्बल 200 ते 250 किलो गांजाची विक्री होत असून हा गांजा तालुक्यातील पुर्वेकडील एका गावातून पुरवला जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री होत असताना पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री होत असताना स्थानिक पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. याचा गैरफायदा बाहेरील अधिकार्यांनी घेतला आहे. हे अधिकारी संगमनेरात येऊन आर्थिक तडजोड करत असल्याची चर्चा आहे.
शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणी एका अधिकार्याची चांगलीच कानउघाडणीही केली होती. शहरात सुरू असलेल्या गांजा विक्री संदर्भात काही जागृत नागरिकांनी पोलीस मुख्यालयातील वरीष्ठ अधिकार्यांना कल्पना दिली. मात्र एकाही अधिकार्यांनी याबाबत दखल घेतल्याचे दिसत नाही.