अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- दारू पिऊन वाहन चालविल्याने बहुतांश वेळा अपघात घडतात. अशा मद्यपी चालकांना शोधण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर या यंत्राचा चांगला उपयोग होतो. या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक मद्यपींवर कारवाई करणे सोयीचे होते.
मात्र हे यंत्र तोंडात घालून तपासणी केली जाते. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या यंत्राचा मागील दीड वर्षांपासून वाहतूक शाखेकडून वापर बंद करण्यात आला आहे.
रस्त्यावर पोलिसांनी एखादा मद्यपी वाहन चालक पकडला तर त्याची शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी करावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया असते. या अडचणीमुळे कोरोना काळात मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे.
२०२० या वर्षात जिल्ह्यात १ हजार ३५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यातील सत्तर टक्के कारवाई या पहिल्या तीन महिन्यात झालेल्या आहेत. कोराेनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद असल्याने पोलिसांचीही अडचण झाली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. ब्रेथ ॲनालायझरचा वापरही बंद आहे. त्यामुळे मद्य प्राशन केलेला वाहनचालक सहजासहजी निदर्शनास येत नाही. त्यामुळे कारवाईचे प्रमाण कमी झाले आहे.