अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शक्तिकांत दास आणखी तीन वर्षे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कायम राहणार आहेत.
शक्तिकांत दास यांच्या गव्हर्नर पदाचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 पासून पुढील 3 वर्षाच्या अवधीसाठी किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत वाढवण्याला मंजूरी दिली आहे.
आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ या वर्षी 10 डिसेंबरला संपणार आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढवला आहे.
शक्तिकांत दास 10 डिसेंबर रोजी 26 वे गव्हर्नर म्हणून पदभार सुरू ठेवतील. शक्तिकांत दास यांना वित्त, कर, उद्योग या क्षेत्रातील कामाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी विविध राज्यांमध्येही सरकारी पदावर काम केले आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी लागू करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी टीम तयार केली होती, त्यातील शक्तिकांत दास हे महत्त्वाचे अधिकारी होते.
नोटाबंदीनंतर लहान-मोठे बदल, घोषणाही शक्तिकांत दास हेच करत असत. नोटाबंदी नेमकी काय आहे, हेही जनतेला माध्यमांमधून दास यांनीच समजावून सांगितले होते.
कोण आहेत शक्तिकांत दास ? 26 फेब्रुवारी 1957 रोजी ओडिसामध्ये जन्मलेले शक्तिकांत दास हे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
35 वर्षांच्या भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी टॅक्स, इंडस्ट्री आणि आर्थिक विषयाशी संबंधित विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती.