केंद्र सरकारचा कडधान्य, डाळी साठवणुकीचा कायदा अन्यायकारक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- केंद्र सरकारच्या वतीने दोन जुलै रोजी पारित करण्यात आलेला कडधान्य व डाळींच्या साठवणुकी संदर्भातला केलेला नवीन कायदा हा व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे.

व्यापाऱ्यांकडून होत असणाऱ्या मागणीनुसार हा कायदा राज्यात लागू होऊ नये यासंदर्भात सरकारसमोर व्यापाऱ्यांच्या भावना मी मांडेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांच्या पुढाकारातून आणि शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर शहरातील व्यापाऱ्यांची बैठक मार्केट यार्ड याठिकाणी ना. थोरात यांच्या नगर दौऱ्या दरम्यान पार पडली. यावेळी ना. थोरात बोलत होते.

निवेदन देत व्यापाऱ्यांना केंद्राच्या या अन्यायकारक कायद्यापासून वाचवावे अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी ना. थोरात यांच्याकडे केली आहे. मंत्री ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारचा साठवणूकी संदर्भातला नवीन कायदा हा निश्चितच अन्यायकारक आहे.

व्यापाऱ्यांचा याला असणारा विरोध हा रास्त आहे. या बाबतीत व्यापाऱ्यांच्या भावना या तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी या कायद्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. व्यापाऱ्यांनी मांडलेल्या भावना सरकार समोर ठेवण्याचे काम मी निश्चितपणे करेल, अशी ग्वाही यावेळी थोरात यांनी व्यापाऱ्यांना दिली.

असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा म्हणाले की, कडधान्य साठवणुकीचा कायदा हा व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे. आधीच कोरोनामुळे व्यापारी हा संकटात असून त्यामध्ये या नवीन कायद्यामुळे अधिक वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीची भूमिका सरकारने घ्यावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, व्यापारी आज संकटात सापडला आहे. केंद्राकडून शेतकरी विरोधी कृषी कायद्यानंतर आता व्यापारी बांधवांकडे मोर्चा वळविण्यात आला आहे.

देशातील सर्व घटकांना संपवून टाकण्याची भूमिका केंद्र सरकारची यातून दिसत आहे. ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून नगर शहरातील व्यापारी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव व्यापार्‍यांच्या पाठीशी आहे.

यावेळी आडते बाजार असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र बोथरा, संतोष बोरा, श्रीगोपाल मनियार, रवींद्र गुजराती, शैलेश गांधी, ललित गुगळे, संजय लोढा, विजय कोथिंबिरे, रमेश सोनीमंडलेचा, किशोर श्रीमाळ, मयूर पितळे, संतोष बोगावत, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा,

काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विशाल घोलप आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24