अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेवासा तालुक्यातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पकडले आहे.
आतापर्यंत चौघे पोलिसांच्या हाती लागले आहेत तर एक जण फरारी असून मुख्य सूत्रधाराचा ठावठिकाणी अद्याप बाकी आहे. या आरोपींकडून सहा इंजेक्शनसह ११ लाख, ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, नेवासा तालुक्यात काही जण या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्यानुसार त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अशोक राठोड आणि आपल्या पथकाला घेऊन सापळा रचला.
नियोजित प्लॅननुसार पोलीस पथकाने रामहरी बाळासाहेब घोडेचोर (वय २२ रा. देसवडे, ता. नेवासा) व आनंद कुंजाराम धोटे (वय २८, रा. भातकुडगांव, ता. शेवगाव) यांना पकडले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन हस्तगत करण्यात आली.
चौकशीत त्यांनी ही पंकज खरड (रा. देवटाकळी, ता. शेवगाव) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने खरड याचा शोध घेऊन त्याला पकडले. त्याच्याकडेही एक इंजेक्शन आढळून आले.
त्याच्याकडील चौकशीत त्याने हे इंजेक्शन सागर तुकाराम हंडे (वय ३०, रा. खरवंडी, ता. नेवासा) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लगेच हंडेला पकडले. त्याच्याकडून दोन इंजेक्शन आढळून आली.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ती हेमंत राकेश मंडल (रा. वडाळा, ता. नेवास) याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी हंडे याच्या कारची झडती घेतली असता डॅशबोर्डमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडील इंजेक्शन, वाहने आणि मोबाईलही अशा सर्व मिळून ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींवर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.