अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सेवानिवृत्त सहायक फौजदार स्व. मच्छिंद्र कुसळकर यांचा वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमास सामाजिक उपक्रमाची जोड देत,

त्यांच्या मुलांनी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त भागातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली.तर पूरामुळे दोन गावांना जोडणारा नदीवरचा पुल वाहून गेला असता, वडिलांच्या स्मरणार्थ पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली.

गरजू घटकातील युवकांसाठी कार्य करणार्‍या युवान संस्थेचे संस्थापक संदीप कुसळकर व अहमदनगर जिल्हा पोलिस दलात विशेष शाखेत कार्यरत असलेले प्रवीण कुसळकर या दोन्ही बंधूंनी वडिलांच्या वर्ष श्राध्दनिमित्त सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून गावात एक आगळा-वेगळा पायंडा रुजवला.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ह.भ.प. महेश महाराज हरवणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड आणि कोळसांगवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कुसळकर कुटुंबीय उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील नानी नदीला पूर आला होता.

पुरामुळे नदीपलीकडे राहणार्‍या 550 गोरगरीब नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला होता. नदीवर पूल नसल्याने मूलभूत गरजांसाठी नागरिकांना शेजारील कोरडगावाला जाणे शक्य नव्हते.

ही गरज ओळखून कुसळकर कुटुंबीयांनी स्व. मच्छिंद्र कुसळकर यांच्या स्मरणार्थ पर्यायी रस्ता दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

तर वर्षश्राद्धनिमित्त तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेवर ही कुसळकर कुटुंबीयांनी कोरोना लसीकरणाबद्दल जनजागृती केली होती. स्व. मच्छिंद्र कुसळकर यांनी पोलिस खात्यात प्रामाणिक आणि माणुसकी जपत प्रदीर्घ सेवा बजावली. त्यांच्या शिकवणीचा आदर्श त्यांचे चिरंजीव संदीप व प्रवीण कुसळकर जपत आहे.