शहर बनतेय चोरट्यांचा अड्डा; दिवसाढवळ्या चैनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व असलेल्या नगर शहरात पोलिसांचा दरारा कमी होऊ लागला आहे. दिवसाढवळ्या खून, जबरी चोऱ्यांसारखे गंभीर गुन्हे घडत असून, अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच आहे.

गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरत असून, नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना बळावू लागली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यावर कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचेच राज्य असल्याचे गुन्ह्यांच्या चढत्या आलेखावरून स्पष्ट होत आहे.

नुकतेच शहरातील बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटलजवळ सोमवारी सकाळी साडेआकरा वाजता दोघा चोरट्यांनी शुभांगी कृष्णा गोसावी यांच्या गळ्यातील २७ ग्रॅमचे दागिने ओरबाडून नेले.

हे चोरटे मोटारसायकलवरून आले होते. याप्रकरणी गोसावी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सोमवारी सायंकाळी अवघ्या दीड ते दोन तासाच्या अंतराने चोरट्यांनी पारिजात चौकातील कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रोडवरील स्टेट बँक चौक व प्रोफेसर चौकात तीन महिलांचे दागिने ओरबाडून पोबारा केला.

एकाच दिवशी झालेल्या या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत घरफोड्यांसह रस्तालुटीच्या घटना वाढल्या असून, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

गेल्या महिनाभरात चोरट्यांनी शहरात वारंवार धूमस्टाईलने महिलांचे दागिने ओरबाडून नेले आहेत. विशेष म्हणजे अनेकवेळा एकाच दिवशी तीन ते चार घटना घडल्या आहेत. या सराईत चोरट्यांना पायबंद घालण्यात शहरातील तिन्ही ठाण्यातील पोलिसांना अपयश येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24