अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- जिल्ह्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या काही प्रमाणात खुल्या करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील नगरच्या नेप्ती उपबाजार समिती, संगमनेरमधील वडगावपान उपबाजार, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व श्रीगोंदा येथील बाजार समिती काही ठराविक वेळेसाठी सुरू राहणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बाजार समितीमध्ये सकाळी 7 ते 11 यावेळेत कांदा विक्री वगळून भाजीपाला, फळे, शेतिमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करता येतील.
मंगळवार (दि.25) मे मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे आदेश लागू होतील. या ठिकाणी अटी शर्तीसह सर्व व्यापारी, नोकर वर्ग, हमाल, मापाडी व कामगार यांची आरटीपीसीआर चाचणी बाजार समितीने करावी व त्यास अनुसरुन पास देणेबाबत कार्यवाही करावी.
संबंधित बाजार समितीने पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन घ्यावा व आवश्यक त्या नियमांचा पालन न करणार्या संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी.
मास्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाजार समिती आवारात प्रवेश देवू नये. असे नियम घालून देण्यात आले आहे.