अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सांगितले की, त्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर हे १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतो.
गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १२५ रुपयांनी वाढ झाली होती. ४ फेब्रुवारी रोजी सुद्धा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरातही घसरण होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात तीनवेळा कपात झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची स्थिती पाहता यात आणखी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या १४.३ किलोग्रॅमच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी मुंबईत ८१९ रुपये मोजावे लागतात.
दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. तर कोलकात्यात सिलिंडरसाठी ८४५.५० रुपये, चेन्नईत ८३५ रुपये मोजावे लागतात.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं सिलिंडरच्या दरात कपात केल्यानं उद्यापासून मुंबई, दिल्लीत सिलिंडर ८०९ रुपयांना मिळेल. तर कोलकात्यात ८३५.५० रुपयांना आणि चेन्नईत ८२५ रुपयांना मिळेल.