अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- साईबाबांच्या शिर्डीच्या भुमीतून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या मुहूर्तमेढ 2000 साली प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी रोवली.
गेल्या 20 वर्षांत सुमारे 1850 हुन अधिक जोडप्यांना विवाहबध्द करून कन्यादान करण्याचे पवित्र काम कोते दाम्पत्यांनी केले आहे.
मात्र यंदाच्या वर्षी करोना पार्श्वभुमीवर शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. वधु-वरांचा विवाह आई-वडील व मामा यांच्या उपस्थितीत लावण्यात येणार असून वधु-वरांच्या अन्य नातेवाईक अथवा मित्रांना या विवाहास उपस्थितीस मज्जाव करण्यात येणार आहे.
वधु-वरांना पोशाख, संसारोपयोगी वस्तू आणि वधुंना मंगळसूत्र मोफत देण्यात येणार आहे. साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने अवघ्या सव्वा रुपयात होणारा यंदाचा 19 वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करोना नियमावलीचे पालन करत गर्दी न करता आणि वधु-वरांचे आई-वडील,
मामा यांच्या उपस्थीतीत येत्या 13, 14 व 22 मे 2021 या तीन दिवशी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे संयोजक शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिली.
दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 वाजता साईप्रसाद अपार्टमेंटच्या प्रांगणात 10 जोडप्यांचा, 14 मे रोजी सकाळी 10 वाजता 10 जोडपे आणि 22 मे रोजी 10 जोडप्यांचा विवाह करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.